Wednesday, April 22, 2009

स्वार्थ आणि परार्थ

स्वार्थ आणि परार्थ

' संसार म्हणजे महापूर। माजीं जळचरें अपार। डंखू धांवती विखार। काळसर्प।। ' असे समर्थांनी सांगितले आहे. तुकोबांनीसुद्घा प्रपंचाच्या विषयात , ' सुख पाहाता जवापाडे , दु:ख पर्वता एवढे।। ' असा दृष्टांत दिला आहे. जवाच्या एका दाण्याएवढे सुख असते आणि दु:ख मात्र एखाद्या डोंगराएवढे असते. तुकोबा प्रापंचिक , समर्थ पारमार्थिक. दोघांचे मार्ग वेगळे पण प्रपंचाबद्दल , संसाराबद्दल दोघांचेही एकमत असल्याचे आढळते. कारण काय ? कारण केवळ या दोघांचीच नव्हे , तर आपल्या सर्व संतांचीच जगाकडे पाहाण्याची दृष्टी अतिशय सूक्ष्म अशी होती. लहानसहान गोष्टींचेही महत्त्व त्यांनी बरोबर जाणले होते आणि त्या महत्त्वाच्या आधारे त्यांनी आपल्या विचारांची बैठक पक्की केली होती. संसाराचे दु:ख , प्रपंचाचे व्यापताप अनुभवल्याशिवाय परमार्थाकडे मन ओढ घेणार नाही , असेही सर्व संतांचे सांगणे आहे. अशारीतीने संसाराच्या तापानें पोळलेल्या जीवाला परमार्थाच्या शीतलतेची ओढ लागणे वेगळे आणि मुळापासूनच पारमाथिर्क विचार बीजरूपाने को होईना पण मनाच्या उदरात बळावणे हे वेगळे. पारमार्थिक विचार हा प्रापंचिक विचाराला छेद देणारा आहे , असे समजण्याचे कारण नाही. भगवंतानी भगवद्गीतेत , ' तू जे जे काही कर्म करशील ते ते मला अर्पण कर ' असे सांगितले आहे. आद्य शंकराचार्यांनी शिवस्तुती करताना , ' यद् यद् कर्म करोमि तत्तअखिलं , शंंभो तवाराधनम्।। ' हे शिवशंकरा , मी जे जे काम करतो ते ते काम ही तुझीच आराधना आहे , असे भावोत्कट उद्गार काढले. याचा अर्थ आपल्या जीवनाची संगत आपण परमेश्वराबरोबर घातली पाहिजे. जीवनमार्गाची संगत परमार्थ मार्गाशी घालावयाची म्हणजे नेमके काय करावयाचे ? असे तुम्ही मला विचाराल! सोपे आहे , ' स्वार्थ हेतुला दिला संक्षेप ज्यांनी जीविती , तो पराथीर् पाहती ' ज्यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीत स्वार्थाचे महत्त्व कमी केले आणि दुसऱ्याचा आनंद तोच आपला आनंद अशा वृत्तीने आपला जीवनमार्ग चोखाळला ते धन्य होत , असे कवि यशवंतांना सांगावयाचे आहे. दुसऱ्याच्या आनंदाने आपण आनंदी होणे , हीच पारमार्थिक विचारांची पहिली पायरी आहे. दुस-यांबद्दल विशेष स्वरूपाची आत्मियता वाटल्याशिवाय हा उच्चदर्जाचा आनंद उपभोगता येणार नाही. तुम्ही दोघांचा विचार करू लागलात की आपोआपच तुमची दृष्टी बदलेल. जगात मोठमोठ्या परोपकारी संस्था , विविध लोकांचे क्लब जे आहेत त्यांच्या ध्येयवाक्यात ' दुसऱ्याचा विचार करा ,' असा उपदेश आपल्याला आढळतो. आजकालचे अनेक साधुसंतसुद्घा अशाच स्वरूपाचे विचार मांडत असताना दिसतात. प्रत्येकाने दुसऱ्याचा विचार करावयाचे ठरविले तर दुसरा त्या प्रत्येकाचा विचार करणारच! म्हणजे एकमेक एकमेकांचा विचार करू लागतील. दुसऱ्याला दु:ख देऊ नये असे जेव्हा कोणी म्हणतो त्यावेळेला समोरच्या माणसानेही त्याला दु:ख देऊ नये हे अभिप्रेत असते. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाशी प्रेमाने , परोपकाराने वागता , त्याच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता आणि तो मात्र तुमच्याशी तशा वृत्तीने न वागता उलट तुमच्या सद्प्रवृत्तीचा गैरफायदा घेतो असे दिसले तर काय करावयाचे ? ह्या बाबतीत विविध संतांची आणि विचारवंतांची मते वेगवेगळी आहेत. ' दु:ख परानें दिधले , उसनें फेडूं नयेचि सोसावें। देईल शासन देव तयाला , म्हणुनी उगेंची बैसावे।। ' असे कोणी कवि सांगतो. तर आपले समर्थ , ' धटासी व्हावे धट , उद्घटासी उद्घट ' असा रोखठोक सल्ला देतात. आता हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत , असे तुम्हाला वाटेल पण तसे ते भिन्न नाहीत. कारण समर्थांचा सल्ला हा जेव्हा समोरची व्यक्ती उद्घट किंवा उर्मट आहे त्याचवेळी आचरणात आणण्यासारखा आहे.समोरचा माणूस कसा आहे हे जोपर्यंत आपल्याला नीटपणे कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी बरेपणानेच वागले पाहिजे , असे समर्थांनी इतरत्रही सांगितले आहे. दुस-याला समजून घ्या , दुसऱ्याच्या वागण्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा असेही समर्थांनी अनेक ठिकाणी नमूद केले आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेपलीकडे समोरचा माणूस आपल्याशी तिरका वागतो , हे ध्यानीं आले की तुम्ही त्याच्याशी वागण्याची आपली पद्घत बदला , असेही समर्थ सांगतात. तुकोबा म्हणजे ' शांतीब्रह्मा ' होते. त्यांच्या तसे वागण्याचा ताप निदान त्या काळात तरी त्यांच्या कुटुंबियांना जाणवला असणारच. कारण कोणी काहीही त्रास दिला तर पांडुरंगालाच साकडे घालून पांडुरंगाकरवीच त्याचे पारिपत्य करावे , अशीच त्यांची मनोधारणा दिसते. तुकोबांनी आपल्या अभंगातून दुष्टदुर्जनांना शासन करावे , असे जरूर सांगितले आहे. ' दया तिचे नाव , भुतांचे पाळण। आणिक निर्दाळण। कंटकांचे।। ' म्हणजे समाजकंटकांचे , दुष्टदुर्जनांचे पारिपत्य करणे हीसुद्घा एकप्रकारची दयाच होय , असे तुकोबा म्हणतात. बायकोच्या आधीन झालेल्या माणसाला मोजून जोडे मारावेत , असाही तुकोबांनी सल्ला दिलेला आहे. ' तुका म्हणे ऐशा नरा , मोजुनी माराव्या पैजारा।। ' पण अशा स्वरुपाचा सर्व विचार हे तुकोबांनी केवळ उपदेशापुरतेच मर्यादित ठेवलेले आहेत. तुकोबांनी कोणावर हात उगारला , कोणाला प्रत्यक्ष दुरूत्तरे केली वा आमनेसामने भांडण केले असे त्यांच्या चरित्रात कुठेही आढळत नाही. समर्थांनी मात्र दुर्जनांचे पारिपत्य करण्याचे कार्य जणुकाही स्वत:च्याच अंगावर घेतले होते. त्या शिवाय का त्यांनी हातातल्या कुबडीत गुप्ती बाळगली ? ' दया क्षमा शांती , तेथे देवाची वसति ' इतपत शांतपणाचा महिमा तुकोबा सांगतात. समर्थांना ते तेवढ्या प्रमाणात मंजूर नाही. समर्थांची विचारधारा वेगळी आहे. खरे म्हणजे हे दोघेही समकालीन. जवळपास एकाच टापूत वावरणारे. म्हणजे समर्थ सातारा जिल्ह्यातले आणि तुकोबा पुणे जिल्ह्यातले पण दोघांचे भावविश्व वेगवेगळे असल्यामुळे त्यांची जगाकडे पाहाण्याची आणि दुस-याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत क्षमाशील दृष्टीने पाहावे , याबाबतची भूमिका वेगवेगळी आहे. मी तुम्हाला नेहमी जो दृष्टांत सांगतो तो याही ठिकाणी लागू पडतो. एकाच प्रकारच्या त्रासाचा , तापाचा सामना करताना कसे वागावे , याबद्दल दोघांंची मते वेगवेगळी आहेत. दोघेही थोर आहेत , दोघेही परमपूज्य आहेत पण या दोन मार्गातून आपण आपला मार्ग निश्चित करताना कालमानाचा , आपल्या अनुकूल-प्रतिकूलतेचा आधार घेऊन तसे वागले पाहिजे.

No comments:

Post a Comment